म्हसोबा हे महाराष्ट्रातील केवळ एक लोकदैवत नसून तो गावकुसाबाहेरचा सांस्कृतिक पहारेकरी आहे. या रांगड्या देवाचा सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय वेध घेणारा विशेष लेख नक्की वाचा. Pic- Google
मूक से मुखर

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवचेतनेचा पहारेकरी: गावकुसाबाहेरचा 'म्हसोबा'

मुख्य प्रवाहापासून दूर, गावकुसाबाहेर वसलेला 'म्हसोबा' केवळ देव नाही, तर तो आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या सामूहिक भीती आणि सांस्कृतिक आधाराचा ऐतिहासिक साक्षीदार.

The Mooknayak Marathi

महाराष्ट्रातील लोकदैवतांमध्ये 'म्हसोबा' हे अत्यंत रांगडे आणि आदिम स्वरूपाचे दैवत मानले जाते. खंडोबा किंवा जोतिबासारख्या दैवतांमध्ये राजकारण आणि शक्तीचे प्रतीक दिसते, तर बिरोबा धनगरी परंपरेशी जोडलेला वाटतो. मात्र, म्हसोबा हा खऱ्या अर्थाने मातीचा आणि गावकुसाबाहेरचा देव आहे. महाराष्ट्राची लोकदैवते समजून घेण्यासाठी केवळ पुराणे वाचून चालत नाही, तर गावकुसाबाहेर जाऊन या दैवतांच्या जत्रांमधील ढोल-ताशांच्या आवाजात स्वतःला विसरावे लागते. लोकधर्म हा ग्रंथांमध्ये कमी आणि लोकांच्या शरीरात, स्मृतीत आणि भीतीत जास्त जगत असतो.

हा देव मुख्य प्रवाहातला नाही. तो गावाच्या मध्यभागी भव्य मंदिरात नसून गावाच्या सीमेवर, बांधावर, स्मशानाजवळ किंवा एखाद्या बाभळीखाली वसलेला असतो. एखादा ओबडधोबड शेंदूर फासलेला दगड हेच त्याचे रूप असते. मानववंशशास्त्रज्ञ व्हिक्टर टर्नर याला 'लिमिनालिटी' (Liminality) म्हणजेच दोन जगांच्या मधली अवस्था म्हणतात. म्हसोबा नेमका याच गाव आणि जंगल, व्यवस्था आणि अराजक, सुरक्षितता आणि भीती यांच्या सीमारेषेवर उभा असलेला सांस्कृतिक पहारेकरी आहे.

डी. डी. कोसंबी आणि गुंथर सोन्थायमर यांसारख्या अभ्यासकांनी लोकदैवतांना पशुपालक, वनकाठी आणि कृषिजन्य समाजाची निर्मिती मानले आहे. म्हसोबाच्या नावातच दडलेली 'म्हैस' त्याला कृषी आणि पशुधनाशी जोडते. काही अभ्यासक त्याला शिवाचे आदिम रूप मानत असले, तरी वास्तवात तो समाजाच्या 'भीतीचे व्यवस्थापन' करणारा देव आहे. पूर्वीच्या काळी पाऊस, रोगराई, दुष्काळ यांसारख्या असुरक्षिततेवर आधुनिक यंत्रणांऐवजी लोकसंस्कृतीने दिलेले हे सामूहिक प्रतीकात्मक उत्तर होते.

म्हणूनच म्हसोबा हा सात्विक देव नाही. तो काहीसा भयकारी असून त्याच्या उपासनेत रक्तबळी, शेंदूर, अंगात येणे आणि रात्रीचे विधी यांचा समावेश असतो. नागर संस्कृतीने दाबून ठेवलेल्या हिंसा, भीती आणि रानटीपणाचे तो प्रतिनिधित्व करतो. वरच्या धर्मव्यवस्थांनी देवाला जितके स्वच्छ आणि सुवासिक केले, तितकाच लोकधर्म मात्र धुळीत आणि घामात माखलेला राहिला. समाजशास्त्रज्ञ डर्खीम यांच्या मते, धर्माच्या माध्यमातून समाज शेवटी स्वतःचीच पूजा करत असतो. म्हसोबाच्या यात्रेतही गाव आपल्या सामूहिक भीतीला आणि स्मृतींना पुन्हा जगत असते.

जत्रेतील अंगात येणे, धावणारे तरुण किंवा ढोलाच्या तालावर तंद्रीत जाणाऱ्या बायका या गोष्टी केवळ 'अंधश्रद्धा' म्हणून झिडकारणे उथळपणाचे ठरेल. मानववंशशास्त्रज्ञ याला 'अल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शसनेस' (Altered state of consciousness) मानतात. ज्या खालच्या स्तरातील समाजात राग किंवा दुःख थेट व्यक्त करण्याची मोकळीक नसते, तिथे शरीर बोलू लागते. अंगात येणे, भाकणूक किंवा किंकाळ्या ही एक प्रतीकात्मक भाषा असते, जी सामूहिक मानसिक निचऱ्याची यंत्रणा म्हणून काम करते.

मरीआईच्या जत्रांमध्येही हेच प्रकर्षाने दिसते. आधुनिक धर्म अनेकदा शरीराला शिस्त लावतो, मात्र लोकधर्म शरीराला बोलू देतो. विशेषतः पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना थेट राग व्यक्त करायला जागा नसते, तिथे 'अंगात येणे' ही सामाजिकदृष्ट्या मान्य असलेली भाषा बनते. यातून दाबली गेलेली भावना (Suppressed emotions) बाहेर पडते. कोविड महामारीच्या काळात आधुनिक समाजानेही टाळ्या वाजवून आणि दिवे लावून अनिश्चिततेवर अशीच प्रतीकात्मक उत्तरे शोधली होती. संकटाच्या वेळी आधुनिक मनुष्यही पुन्हा विधींकडे (Ritualistic) वळतो, हे यातून स्पष्ट होते.

म्हसोबाच्या यात्रेत जातीसंबंधांची गुंतागुंतही दिसून येते. धनगर, रामोशी, दलित समाज, शेतकरी आणि गुराखी यांसारखे मुख्य सत्तेच्या परिघाबाहेर असलेले घटक या उत्सवांमध्ये केंद्रस्थानी असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेला 'बंदिस्त कप्पे' (Closed compartments) म्हटले होते. मात्र, लोकउत्सवांच्या काळात हे कप्पे काही काळासाठी सैल होतात. जत्रा या केवळ धार्मिक घटना नसून त्या सामाजिक वाटाघाटींच्या (Social negotiation) जागा असतात.

एरवी गावात ज्याचा आवाज नसतो, तो यात्रेत मध्यभागी येतो. ढोलकरी, गोंधळी, वाघ्या, पोतराज हे काही दिवस दृष्टिक्षेपात येतात. व्हिक्टर टर्नर याला 'कम्युनिटास' (Communitas) म्हणतात, जिथे क्षणभरासाठी सामाजिक उतरंड बाजूला पडून सामूहिक भावना वर येते. लोकधर्माचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो सिद्धांतावर नाही, तर लोकांच्या सामूहिक शहाणपणावर चालतो.

आज आधुनिकता आली, मोबाईल, रील्स आणि डीजे आले तरी म्हसोबा संपला नाही. कारण माणसाची समूहाचा भाग असण्याची गरज संपलेली नाही. शहरी वर्ग अध्यात्मासाठी पॉडकास्ट किंवा रिट्रीट्सचा आधार घेत असेल, पण बहुसंख्य समाजासाठी जत्रा याच सामूहिक जाणिवांच्या (Collective consciousness) जागा आहेत. त्यामुळेच, महाराष्ट्राचे सामूहिक अवचेतन समजून घेण्यासाठी विद्यापीठातील आखीव अभ्यासक्रमांपेक्षा गावकुसाबाहेरच्या म्हसोबाकडे जाणे अधिक गरजेचे आहे.

॥ म्हसोबाच्या नावानं चांगभलं ॥

लेखक : सचिन आनंद तुपेरे (संशोधक आणि स्वतंत्र लेखक - गंगापूर, छत्रपती संभाजीनगर)

All stories have been translated with the help of AI, and The Mooknayak Marathi is not responsible for any content errors.